टी-२० वर्ल्ड चॅम्पियनचा टॅग;'वाइल्ड कार्ड' एन्ट्री मिळताच ठोकली फिफ्टी
T-२० वर्ल्ड चॅम्पियनचा टॅग;'वाइल्ड कार्ड' एन्ट्री मिळताच ठोकली फिफ्टी
टी-२० वर्ल्ड चॅम्पियन टीमचा भाग असलेल्या शिवम दुबेनं कमबॅकमध्ये संधीचं सोनं करून देणारी खेळी केलीये. पुण्याच्या मैदानात रंगलेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाची अवस्था बिकट झाली होती. ५७ धावांवर भारतीय संघाने ४ विकेट्स गमावल्या होत्या. दुखापतीतून सावरून मैदानात उतरण्याचं चॅलेंज अन् त्यात भारतीय संघाची बिकट अवस्था या दुहेरी आव्हानासह शिवम दुबेनं खेळाला सुरुवात केली. हार्दिक पांड्यासोबत तगडी भागीदारी करताना त्याने आपल्या भात्यातील फटकेबाजीची झलक दाखवली. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर दुहेरी धाव घेताना तो धाव बाद झाला. त्याआधी त्याने अर्धशतक पूर्ण करत संघाचा डाव सावरण्याचं मिशन फत्तेह केले होते.
नितीशकुमारच्या जागी झाली टीम इंडियात एन्ट्री
शिवम दुबे हा टी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघाचा भाग आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या फायनल मॅचमध्येही त्याने छोटीखानी पण उपयुक्त खेळी केली होती. पण दुखापतीमुळे तो संघाबाहेर गेला. दुखापतीतून सावरल्यावर परतीसाठी त्याला प्रतिक्षेत थांबावे लागले. इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेसाठी टी-२० वर्ल्ड चॅम्पियन शिवम दुबेला बाजूला ठेवून नितीश कुमारला पसंती देण्यात आली. यामागचं कारण दुखापतीमुळे देशांतर्गत क्रिकेटमध्येही शिवम दुबे बॅक टू बॅक शून्यावर बाद झाला होता. पण नितीश कुमारनं दुखापतीमुळे इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतून माघार घेतली आणि शिवम दुबेला टीम इंडियात कमबॅकची संधी मिळाली. रिप्लेसमेंटच्या रुपात संघाच्या ताफ्यात जॉईन झालेल्या शिवम दुबेला चौथ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधीही मिळाली. महत्वपूर्ण अर्धशतकी खेळीसह त्याने कमबॅकमध्ये आपला तोरा दाखवूनही दिला.
हार्दिक पांड्यासोबत दमदार भागीदारी, दोघांच्या अर्धशतकामुळं सावरला टीम इंडियाचा डाव
शिवम दुबेनं आधी रिंकू सिंहच्या साथीनं २१ धावांची भागीदारी केली. तो तंबूत परतल्यावर हार्दिक पांड्याच्या साथीनं त्यानं डाव पुढे नेला. शिवम-हार्दिक जोडीनं सातव्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी केली. यात दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघानं निर्धारित २० षटकात ९ बाद १८१ धावांपर्यंत मजल मारली. अखेरच्या चेंडूवर दोन धावा घेण्याच्या नादात शिवम दुबे धावबाद झाला. त्याने ३४ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५३ धावांचे योगदान दिले
Comments
Post a Comment